गीत शाकुंतल
प्रस्थावना : महाकवी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम् चे अंतरंगात ——
शाकुंतल ! महाकवी कालिदासाच्या उत्तुंग प्रतिभेने प्रसवलेले अक्षर नाट्यकाव्य ! केवळ शारीरिक सौंदर्यावर आधारित असलेले आकर्षण हे खरे प्रेम असूच शकत नाही. ह्या आकर्षणाचं चिरंजीव प्रेमात रूपांतर होण्याकरिता , त्याला पश्चातापाच्या आणि त्यागाच्या अग्नितून तावून सुलाखून निघावं लागत आणि त्यानंतर जे टिकत तेच खरं बावनकशी सोनं , तेच खरं स्वर्गीय प्रेम अन् चिरंतन सुखाचं अधिष्ठान. सुंदर वृक्षलतांनी , झुळझुळणाऱ्या निर्झरानी , किलबिलणाऱ्या पक्षी विशेषांनी, समृद्ध असलेल्या ऐहिक वातावरणात तरुण दुष्यन्त शकुंतलेची प्रथम भेट कालिदासाने घडविली . निव्वळ नयन शरांनी एकमेकांना विध्ध्द करून प्रेमाचा प्रथम प्रादुर्भाव परस्परांच्या हृदयात निर्माण केला. पण पुढे दोघांही प्रेमिकांना परित्याग , पश्चाताप आणि एकनिष्ठता अशा अवस्थांतून जायला लावून मारीच ऋषींच्या तपौधनांतील स्वर्गीय वातावरणांत त्यांचे पुनर्मीलन घडवलं म्हणूनच “शाकुंतल “ म्हणजे वसंतात बहरणाऱ्या फुलोऱ्याचं , शरदातल्या मधुर फलांत होणारं रूपांतर . त्या रूपांतराची रमणीय कहाणी ! धरा आणि स्वर्ग ह्यांच्या मीलनाचं अमर काव्य ! भारतीय संस्कृतीचा हा दिव्य संदेश देण्याकरिता शृंगारासारखा सर्वज्ञात रसराज कालिदासाने निवडला हेच त्याच वैशिष्ट्य ! सर्वकाल अबाधित सर्वसामान्य मानवी प्रकृतीचं नैसर्गिक दर्शन दुष्यन्त शकुंतलेच्या रूपानं घडवलं म्हणूनच त्याचं चिरंजीवीत्व ह्या नैसर्गिक प्रकृतींच दर्शन शाकुंतलात आरंभापासूनच घडू लागतं. आणि ह्या दर्शनाच्या आनंदाचा पुनःर्प्रत्यय घडविण्याचा मी माझ्या गीत शाकुन्तलातून अल्पशः प्रयत्न करीत आहे. सौंदर्याचा साक्षात्कार घडविणाऱ्या ह्या महाकवीच्या चरणी मस्तक आपोआपच आदराने नमते, आणि म्हणूनच ———–
अमर कृति कला ही , निर्मिली ज्या कवीने
कविकुल गुरूला त्या, वाहिली भाव सुमने
रचुनि कवन हारा, “गीत शाकुंतलाने”
कवि पद कमलाते , अर्पिला सन्मनाने.