
॥जय जानकी दुर्गेश्वरी॥
प्रोत्साहनार्थ
बडोद्यातील विश्वामित्री येथे २४ मार्च १९८० रोजी सावलीचे पहिले वाचन झाले आणि त्या क्षणींच सावलीचे माझ्या आयुष्यात पदार्पण झाले ते सावली देण्यासाठीच असं म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. माझ्या जीवनांत सावली आली आणि आतापर्यंत तिच्या स्पर्शाशिवाय माझा एकही दिवस जात नाही. ह्या सावलीने माझे जीवनच बदलून टाकले. सावलीतील इतरांचे अनुभव वाचतांना मन इतके रमून जाते की वेळेचे भानच उरत नाही. चिमुकली पांच वर्षांची दुर्गा प्रथम कोणाला कळली? तर नागांना!
परी दुर्गा जाता वृक्षाजवळी। सर्वांची होय पळापळी। फळे तोडुनिया सगळी। वाटीतसे ती मुलांना॥ (अ. १, ८८)
असे हे सर्व तिला बघून पळून जात. ती पण नित्यनेमानें दूधाची वाटी त्यांच्या समोर ठेवून त्यांना तृप्त करीत असे, हे दृश्य जेव्हा तिच्या आजोबांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले तेव्हा ते समजून गेले की हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. पुढे जेव्हा ह्या मित्राच्या अंगावर झाड पडून त्याला जखम झाली तेव्हा आईंनीच (पूर्वाश्रमीची दुर्गा) पंधरा दिवस रोज अंगारा लावून पंधरा दिवसांत बरे केले. अशी ही भूतदया आपणही प्राणीमात्रांवर केली पाहिजे अशा बोध अप्रत्यक्षपणे दिला गेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या घरातील दुधदुभते, लोणी आजूबाजूच्या गोर गरीबांना, गरजूंना देऊन त्यांना संभाळून घ्यायच्या. त्यांच्या ह्या स्वभावामुळे कित्येक वेळा त्यांच्यात व दादांच्यात (त्यांचे पति) भांडणे होत, खटके उडत, पण त्या त्यांच्या कर्तव्यापासून तिळमात्र ही ढळल्या नाहीत. हो पण ह्याच आईंनी जेव्हां शेजारच्या शेतकऱ्याने गुरांवरुन दादांना कोर्टात खेचले तेंव्हा त्याला अशी अद्दल घडविली की त्याला दादांचे पाय धरावे लागले. अशाप्रकारे कोणत्याही पतिव्रता स्त्रीला पतीचा मान पत्नीनेच राखावयाचा असतो असा सुप्त बोध ह्यातून दिला गेला आहे (नव्हे सुचविलाच आहे). दृष्टीहीन बालकाला मांडीवर घेऊन, (अ. ६, २०) ‘हात फिरवीत अंगावर! म्हणे काशीनाथ लौकर। उघड लोचन आपुले।’ तो काशीनाथ ‘डोळे उघडीत। दृष्टी येऊनी लोचनांत। टकमक पाहे सर्वांकडे। तसेंच लुळ्या-पांगळ्या बालिकेला उंच उंच उडवून सुदृढ केले आहे. हे सर्व चमत्कार फक्त आईंनीच करावेत. आईंनी आपल्या भक्तांना कधी विन्मुख केलेले नाही आहे. गर्भाशय काढून टाकल्यावर पुत्रवियोगा न साहून मदत मागण्याऱ्या (मदतीचा हात मागणाऱ्या) आईला त्या म्हणाल्या पूर्वी न केलास विचार। मग दैवांत कोठुनि येणार। परि विश्वासितां मजवर। प्रयत्न पाहीन करोनी।’ (अ.७, ९६) यथावकाश गर्भाशयाची निर्मिती करून तिला पुत्रप्राप्तीही करून दिली. अशाप्रकारे अश्यक्य गोष्टी शक्य करणे हें जानकी आई शिवाय कोणाला जमणार! कोणाचीही हांक पूर्ण होण्याआधीच आई त्याला मदत करतात हे सांगायला नकोच.
मृत्युआधी एक वर्ष आधी आईनी एका मांत्रिकासाठी मोठा यज्ञ करून त्याची वाईट विद्येपासून सुटका केली होती व नंतरच्या वर्षांचे रहस्य (आईचे मरण) त्याच्याजवळ व्यक्त करून गोहत्येच्या वधाची शपथ घालून कोणालाही न कळविण्याचे बंधन घातले होते. (बंधन घालायला विसरल्या नाहीत). तसेच आपल्या वर्षा नंतरच्या मृत्युची तारीख वार सह नोंद स्व-हस्ताक्षरात करून तांत्रिकावर येणाऱ्या पुढल्या संकटातून त्याची सुटका केली होती. त्यामुळे मांत्रिकाकडे संशयाने बघणारे संशयितही आश्चर्यचकित झाले व आईनी वर्षभर हे सर्वापासून कसें लपविले, कसं सर्वांना आपल्यापासून लांब ठेवले, त्यांची मन:स्थिती कशी झाली असेल ह्याचे समर्थन करू लागले. आपली देहयात्रा संपवतांना शांतपणे रहावे हे फक्त आईंनाच शक्य झाले. जरी त्या देवी होत्या तरी मनुष्य जन्म धारण केल्यावर मनुष्याचे गुणधर्म त्यांच्या अंगी आले होतेच त्यामुळे आपले दुःख कोणालाही न दर्शविता त्यांचा निरोप घेऊन देहयात्रा संपविणे किती कठीण आहे ह्याचा अनुभव आईंना आला असेलच असा विचार मनात डोकावतोच. आपल्या मृत्युनंतर सर्वजण भांबावून जातील व काय करायचे हे त्यांच्या लक्षातही येणार नाही म्हणून की काय त्यांनी सौ. कुसुमताईना तशी कल्पना दिली होती. म्हणूनच की काय आपलं दुःख आवरते घेऊन आईच्या इच्छेप्रमाणे सवाशीणीसाठी काय काय करावयाचे तसं सर्व करून आईंना निरोप दिला. अंत्ययात्रेहून आलेल्या दुःखी लोकांना प्रकाशाचा झोत दाखवून त्या तेथेच असल्याची जाणीव करून दिली. तेराव्याला आलेल्या (जवळ जवळ तीनशे) सर्व सवाशीणींची ओटी भरण्यासाठी साड्या पुरवल्या व आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. जणू त्यांनी सांगितले की बाळांनो, तुम्ही एकटे नाही आहात, मी तुमच्यातच आहे फक्त देह रूपात नाही. आईनी आजपर्यंत त्यांचे म्हणणे खरे केलेले आहे. त्या आपल्या भक्तांना वेगवेगळ्या मार्गाने दर्शन देतात पण हे ज्यांना कळते त्यांचे हात आपोआप जोडले जातात.
आपल्या लाडक्या कुटुंबियांना व भक्तांना सोडून आई कधीच गेल्या नाहीत व जाणार नाहीत. ह्याची प्रचिती लौकरच सर्वांना आली आणि म्हणूनच की काय विनयच्या शस्त्रक्रियेच्या वेळी परिचारिकेच्या रूपात ह्या भूतलावर अवतरल्या तर शेखरच्या वेळी चांदेरी डोंगरावर कांटेकुट्यात रात्री त्याच्याजवळ बसून प्रेमाने हात फिरवत राहील्या. म्हणूनच शेखर बेशुद्धअवस्थेत असताना बोलत होता. अंगात आहे आईचा शर्ट! त्याला न करावा स्पर्श। (अ. १६, ४०) आईचा स्पर्श त्याला जाणवत होता. आईनी जवळ बसून ज्याचे रक्षण केले आहे.
आई भेदभाव, माझं तुझं कधीच करत नाहीत म्हणूनच कानावर भक्ताची हांक पडताचं त्या मदतीला धांवतात, कधी कोणाच्या कोणाच्या रूपात येतात तर कधी अप्रत्यक्षपणे मदत करतात. त्यांनी कधी कोणाच्या शरीरातील गांठी नाहीशा केल्या आहेत. तर कोणाचे कोणते आजार नाहीशे केले आहेत. कधी कधी डॉक्टरांना पण प्रश्न पडतो की हे कसे घडले. डॉक्टरही चकीत होऊन गेले आहेत.
जितके जुने भक्त आईंना प्रिय आहेत तेव्हढेच नवीन भक्तही प्रिय आहेत. त्यांच्यातले जुने-नवे सारखेच आहेत. आईचे त्यांच्या भक्तावर एवढे प्रेम आहे की एखादा कोणी अडचणीत असेल, दुःखात असेल आणि एखाद्या जानकी भक्ताने त्याला उपाय सुचवीला तरी त्या भक्ताला यश येते. कारण आई ताबडतोब त्या भक्ताला मदतीचा हात देतात व अप्रत्यक्षपणे त्याची दुःखातून सुटका करतात. आईच्या ह्या थोरवीचे कौतुक करावे तेवढे कमीच आणीबाणीच्या काळात कोणासाठी टॅक्सी घेऊन त्या धांवल्या आहेत तर नासलेल्या दुधाच्या कॉफीचे रूपांतर स्वादिष्ट कॉफीत केले. हे कसे ते आईलाच माहित. सावली सारखी सावली फक्त आईच देऊ शकतात. सावलीतूनच आई कशा अष्टपैलू आहेत हे समजते. सावलीच्या अठरा अध्यायांत आईच्या बालपणापासून अंत्यमापर्यंत वर्णन आहे. हे वर्णन इतके अप्रतिम लिहीले गेले आहे की प्रत्यक्ष जानकी आईच हुबेहुब डोळ्यासमोर उभ्या राहतात. इतके करूनही त्यांची पुढची वाटचालही वर्णिली गेली आहे. ह्यावरून त्यांचे चमत्कार अजूनही घडत आहेत, ह्यावर विश्वास बसतो. आईच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला काहीना काही तरी शिकवण मिळत गेली आहे. सर्वांशी म्हणजे प्राण्यांशी सुद्धा प्रेमाने वागायचे अशी शिकवण दिली आहे. म्हणूनच देवीचा रेडा त्यांच्या घरासोमर आला तेंव्हा त्यांनी घरातल्या रेड्याला त्याच्यासमोर येऊन दिले नाही व दोघांनाही मुक्ती दिली.
जानकी परिवार हे एक कुटुंबच समजले जाते. जसं आपल्या कुटुंबात आपल्याला आधार मिळतो, तद्वतच जानकी परिवारात सर्वांना एकमेकांचा आधार दिला जातो व सर्वांची सुख-दुःखे एकच समजली जातात व मदत केली जाते. ह्या परिवारात लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष एवढंच काय जाती भेद, धर्मभेदही मानला जात नाही. सर्व गुण्यागोविंदाने वागतात. माझं -तुझं मानलं जात नाही. आईची ही शिकवण समजा. जानकी परिवाराने आचरणांत आणले पाहिजे; सावलीचे मुखपुष्ठ किती सार्थ आहे हे आईच्या चमत्कारातून समजते. आई घारीच्या नजरेतून आपल्या सर्वांकडे, त्यांच्या भक्तांना बघत आहेत व वेळेवर मदतीला येऊन रक्षण करत आहेत. आईचे भक्त त्यांच्या उबेत सुरक्षित आहेत. प्रत्येकाचे भोग प्रत्येकाला भोगायलाच हवेत पण ते सहन करायची शक्ती आईपासून मिळते. म्हणून सर्वजण सुखी आहेत.आईची सावली सर्वांवरच आहे.
ज्याच्या हातांत सावली। त्याच्या पाठीराखी जानकी आई॥
सौ. सिंधु सुरेशचंद्र गुप्ते (ठाणे)