भाद्रपदीच्या शुध्द चतुर्थीस गणपति येती घरोघरीं
प्रेमें पूजन उत्सव करिती आनंदानें नरनारी ॥धृ॥

गणपति येतां कितीतरीं हो चंगळ होते मुलांची
रोज आरति, प्रसाद देती, हाती खिरापतीची ॥१॥
लाडू- मोदक खाताखाता पोटच अमुचे ये वरती
गणपतिबाप्पा अम्हास म्हणती, सारे आम्हा चिडविती ॥२॥
अरे मुलांनो माहित कां रे कथा आपुल्या देवाची
तोंड गजाचे कसे तयाला, कथा सांगतो गमतीची ॥३॥
इथे बसा या तुम्ही सारे, कथा ऐकण्या जन्माची
कथेकरी मी तुम्हास वदतो, गोष्ट गणपति बाप्पाची ॥४॥

कैलाशीं घरी आई पार्वती बैसली होती स्नानाला
अंगीचा मळ काढुनी बनवी, एक सानुल्या बाळला ॥५॥
सजीव करुनि त्यास बोलली, बैस बाहेरी दाराला
कुणा न येऊ देऊ आंत की , जोवरी करिते स्नानाला ॥६॥
बाळ बैसला तोंच पातले, शंकर अपुल्या घराला
आडविणारा कोण म्हणुनि तूं, कोपे उडवी मानेला ॥७॥
पाहुनि शंकर गिरीजा वदली, आंत कसे हो आलांत?
कुणी न यावें आंत, ठेविले बाळाला मी दारांत ॥८॥
छाटुनि आलो मान तयाची शंकर बोले गिरीजेला
हाय! हाय! मम बालक वधिले, माऊली लागे रडायला ॥९॥
नको रडू मग शंकर बोले, जोडीन त्याचे मानेला
सकल जनांचे दु:ख हराया पुत्र येतसे जन्माला ॥१०॥
उद्या सकाळी येईल दारी, मान तयाची त्या लावू
तोंवरी आपण वाट तयाची येथें बैसुनिया पाहू ॥११॥
डोलत डोलत भल्या पहाटे हत्ती दाराशीं आला
झटकन त्याची मान उडवुनी, बैसविली त्या बाळाला ॥१२॥
देह मानवी मूख गजाचे, गणपति ऐसा हा झाला
प्रारंभि करूं वंदन त्याला, चला चला हो आरतीला ॥१३॥

भाद्रपदीच्या शुध्द चतुर्थस्वीस गणपति येती घरोघरीं ॥धृ॥

अरे मुलांनो गंम्मत झाली कथा सांगतो बाप्पाची
मुषकावरती बसून फिरण्या हौस असे या देवाची ॥१४॥
उंदीर छोटा देहचि मोठा, सोंड हलवुनि हे फिरती
ध्यान तयाचे ऐसे पाहुनि चंद्र हासला तो वरती ॥१५॥
कोण हासला म्हणुनि पाहतां, तोल जाऊनि तें पडती
दांत तयाचा तुटला तेंव्हा पुरती झाली की फजिती ॥१६॥
खदा खदा मग चंद्र हांसला, पाहुनि होती डोळे लाल
चतुर्थिचे दिनीं चंद्र पाहतां चोरीचा त्यांवर ये आळ ॥१७॥
शाप तयाला ऐसा देऊनि, बाप्पा तेथुनिया पळती
माऊलीच्या मग कुशींत शिरतां मोदक दे हातावरती ॥१८॥
मोदक खाऊनी तट्ट फुगले, पोटही त्यांचे ये वरती
एकदंत वा लंबोदर की तेंव्हापासुनिया म्हणती ॥१९॥
देव धनाचा देव सुखाचा देव असे तो विद्येचा
सकल मंगल कार्यामाजीं श्रेष्ठ असे बहुमानाचा ॥२०॥

भाद्रपदीच्या शुध्द चतुर्थीस गणपति येती घरोघरीं
प्रेमें पूजन उत्सव करिती आनंदानें नरनारी …. ॥धृ॥

गणपति बाप्पा मोरयाऽऽऽऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽऽऽऽ

Click to rate this post!
[Total: 3 Average: 3.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *