भास्कर नामे विप्र कथा (अ-३८)

भास्कर नामे ब्राह्मण आला ईच्छा मनी घेऊन 

श्री स्वामींना भोजन देईन, शिजवुनि मी अन्न        ॥धृ.।।

तीन जणांच्या सामुग्रीला, घेऊनि कटी आला 

संकल्पाचा उच्चारही त्याने, मनोमनी केला 

परि पहाता नित्य होतसे, सहस्त्र आराधन 

मनांत भ्याला, संकल्पाची, लाज मनी वाटुन        ।। १।। 

प्रतिदिनी येथे नित्य होतसे, सहस्त्र आराधन 

श्री स्वामींना शरण जाऊनि, करी क्षमा याचन 

चुकलो देवा, परत घेतसे, माझे मी वचन 

परि भक्तगण करुन देति, अपराधाची जाण         ।। २।। 

कळता सारे श्रीस्वामींना, करिती पाचारण 

आज करावे तूं आराधन, स्वयें करिन भोजन 

तीन जणांचे अन्न शिजविले, श्री आज्ञा म्हणुन 

कफनी त्यावर टाकुनि वदती, द्यावे आमंत्रण         ।।३।।

चार सहस्त्र जेविले ब्राह्मण आणि पशु, पक्षी, जलचर 

अल्पची भिक्षा, परी तयाचा, केला पहा डोंगर 

प्रसन्न झाले, स्वामी, शिरावर ठेविती शुभंकर 

श्रीयायुक्त तूं होशिल बाळा, मजला प्रिय जाण        ।। ४।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]